Ranveer Singhs Kantara Mimicry Row:गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता रणवीर सिंह या ना त्या कारणामुळं चर्चेत आहे. ‘कांतारा’ चित्रपटातील ऋषभ शेट्टी भूमिकेची नक्कल केल्यानं तो वादात अडकला होता. या प्रकरणात आता त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई: ‘कांतारा’ चित्रपटातील दैवी पात्राची नक्कल केल्याप्रकरणी वादात सापडलेला बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याला कर्नाटक उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. रणवीरनं या प्रकरणी सादर केलेली नवी बिनशर्त माफी आणि प्रतिज्ञापत्र न्यायालयानं मान्य केलं असून, त्याच्यावरील फौजदारी कार्यवाही (FIR) रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
२०२५ मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) एका कार्यक्रमादरम्यान रणवीर सिंहनं ‘कांतारा’ चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचं कौतुक करताना ‘दैवा’ किंवा पवित्र देवतेची नक्कल केली होती. यावेळी बोलताना त्यानं चुकून या पवित्र शक्तीचा उल्लेख ‘भूत’ असा केला होता. यामुळं कोस्टल कर्नाटकच्या ‘भूत कोला’ परंपरेचा आणि धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचा आरोप करत बेंगळुरू इथल्या वकील प्रशांत मेथल यांनी रणवीरविरोधात एफआयआर दाखल केला होता.
